सोमवार, २५ एप्रिल, २०१६

लक्ष्मीबाई …शरणाप्पा… हरिहर …

रवि तळेवाडीकरांचा फोन आला तेव्हा मी आरश्यात माझ्या सुकट शरीराचे कौतुक पहात होतो . एक ३०-३५ वर्षांची महिला मनोरुग्ण मेन रोडवर दिसली असल्याचे त्यांनी सांगितले . मी तात्काळ कपडे चढवून निघालो . मुख्य रस्ता पूर्ण पालथा घातला तरी ती दिसेना . अस्वस्थ होऊन रविदादाला पुन्हा फोन लावला आणि तिचे वर्णन विचारले . कामाच्या गडबडीत त्यांनी हि बाब नजरंदाज केली होती . ' नाही सापडली तर काय ! ' ह्या प्रश्नात मी बुडलो असताना शीला टीचर यांच्या काकांनी ती रोझरी हायस्कुलकडे चालत गेल्याचे सांगितले . मी तसाच पुढे गेल्यावर ती मला दिसली . मी माझ्यासोबत खायला काहीच आणले नव्हते . तिथेच थांबून रविदादांना काही तरी खायला घेऊन या म्हणून सांगितले . ते तात्काळ आले . मग मी तिच्याशी मराठी , हिंदी आणि मोडक्या कन्नड भाषेत काही प्रतिसाद येतो का ते पाहिले . ती दोनच शब्द बोलली ' वडा खाते '. मग मी तिच्या समोर बसलो आणि तिला खायला दिले . ह्या दरम्यान 'मी तुला तुझ्या भावासारखा आहे ना ? ' असं तिच्या मनावर बिंबवून विश्वास संपादन केला . ह्या पूर्ण कालावधीत रस्त्याने येणा - जाणारे लोक उत्सुकतेने ब्रेक मारून , पाहून पुढे जात होते . यामुळे ती बिथरली आणि उठून चालायला लागली . मी पुन्हा तिला तिचा भाऊ असल्याची आठवण करून दिली आणि रस्त्याच्या कडेला थांब कारण खूप गाड्या इथून जातात असे सांगितले . तीने ऐकले . हि ३० -३५ वर्षांची महिला आपले नाव लक्ष्मीबाई असे सांगत होती . सायराप्रमाणे हि खूप आक्रमक मला वाटली नाही . पण हि खूप दिवस अशी रस्त्यावर राहणे ठीक नाही हे मला माहित होते . मी आता ह्या लक्ष्मीताईला उपचारांसाठी दाखल करण्यासाठी नेण्याच्या तयारीला लागलो . पण माझ्यासमोर मोठ्ठा प्रश्न होता कि , पैसे जमा होईपर्यंत हिला कुठे ठेवायचे ! रुमवर मी पुरुष मनोरुग्णांना आरामात घेऊन जाऊ शकतो . पण लक्ष्मीने बिथरून / घाबरून दंगा केला तर काय ! अगदी सायराही ५ दिवसांच्या विश्वासाच्या जोरावर रूमपर्यंत आली होती . तेव्हा तिच्यासोबत क्रांती , गीताताई होती . पण आता क्रांतीला असल्या कामासाठी घरातून पाठींबा नव्हता आणि गीताताई बाहेर कुठेतरी जात असल्यामुळे तिच्या घरी लक्ष्मीला ठेवता येत नव्हते . ग्रामीण दवाखान्यात ठेवण्याचा विचार आला डोक्यात ; पण मागच्या वेळी बावेलीच्या मनोरुग्ण म्हातारीच्या वेळी मला दवाखान्याचा आलेला अनुभव पाहता हि फक्त ' माझीच अडचण ' होती . ती ज्या झाडाखाली झोपली होती तिथेच तिला राहू द्यायचा मी निर्णय घेतला . दुसरा पर्यायच नव्हता . तिथे ग्रामीण रुग्णालयाच्या आवारात खानावळ चालवणाऱ्या आजींना सांगून तिला खायला काही लागले तर द्या मी नंतर पैसे देईन असे सांगून मी बाकीच्या तयारीला लागलो .
पुन्हा एका तासाभराने तिथे गेलो तर ती तिथे नव्हती . मी तिला इथून सोडून जायला नकोच होते असे राहून राहून वाटत होते . माझ्या वागण्याचा मला राग आला . पण मग गाडीला पैसे जमा कोण करणार हा हि प्रश्न होताच ! १० - १५ मिनिटे मी इकडून तिकडे तिचा शोध घेत होतो . तेव्हा अवंडी वसाहतीच्या रस्त्याच्या कडेला राहणाऱ्या एका गोसावी ( भंगार गोळा करणारे ) समाजातील आजींनी असे सांगितले कि , ' ती आमच्या घराकडे चालत आली . मला तिची अवस्था बघून खूप दया आली . मी तिला आंघोळ घालून माझी साडी नेसायला दिली आहे . आणि ती आता माझ्या सुनेबरोबर लाकडे जमा करण्यासाठी गेली आहे . तू काही काळजी करू नकोस ; पोर लयी चांगली हाय ! ' एवढं सगळं म्हातारीनं एका दमात सांगून टाकलं आणि माझा तणाव दूर केला . मी म्हातारीला ' तू खूप मोठे उपकार केलेस माझ्यावर असे म्हटले ' . यावर ती म्हणाली कि , ' ह्यात उपकार कसलं , माझ्या पोरीसारखी पोर ती ! ' तिनं असं बोलल्यावर माझ्यासमोर मला हे काम करत असताना आपल्याच लोकाकडून मिळत असणाऱ्या अनुभवांची यादी आठवली , त्यांचे हेवेदावे , त्यांच्या टीका आठवल्या . असो ! माझ्या डोळ्यांत पाणी आले . मी म्हातारीला तिला तुमच्याकडे आजची रात्र थांबवून घ्याल का म्हणून विचारले . म्हातारी म्हणाली ' राहू दे काय अडचण नाही' . दवाखाना आणि आपण पांढरपेशे लोक अशा प्रकारच्या मनोरुग्ण व्यक्तीला घरात ठेवून घ्यायला राजी नाही आहोत . आपण चकचकीत / टापटीप राहतो . ह्या चकचकित कुटुंबात अशा माणसाला ठेवणे अशक्य असते . आपण कितीही समाज बदलाच्या / समाजसेवेच्या गप्पा मारत असलो तरीही !! माझ्या डोक्यावरचा किती मोठ्ठा भार ह्या म्हातारीने हलका केला होता म्हणून सांगू ! २ दिवस आपल्या घरात लक्ष्मीबाईला ठेवून घेतलेल्या म्हातारीला मी नंतर लुगडं भेट दिलं तेव्हा ती मला म्हणाली कि , ' कशालावं आणलं हे ? '
शनिवार असल्यामुळे अम्बुलंस साठी पैसे जमा होतील का नाही या तणावात मी होतो . कारण ३१ मार्च असल्याचे कारण सांगून आदल्या दिवशी मला काही लोकांनी कटवले होते . १०० - २०० रुपये खिशात नसतात असे यांच्याकडे बघून वाटत नाही . गाडीत पेट्रोल घालण्यासाठी मी विशुभाऊ खोत यांच्याकडून २०० उसने घेतले होते . याचकासारख्या अवतारात दिवसभर मी फिरत असतो . कधी कधी इतके वाईट अनुभव येतात कि वाटते आपण नोकरीत असायला हवे होते ! काही लोक मनाचा इतका कोतेपणा दाखवतात कि मला कीव येते त्यांची . पण मी थांबत नाही . दुसर्या दिवशी पुन्हा सकाळी ९. ०० पासूनच पैसे जमा करण्यास सुरुवात केली . आणि अवघ्या २ तासात ५५०० रुपये जमा झाले . इतकी रक्कम पुरेशी होती अम्बुलंस घेऊन जाण्यासाठी . तरीही अम्बुलंस नाही मिळाली तर लक्ष्मीला बस ने घेऊन जायचे असे मी ठरवले होते . रेल्वेने जाण्याच्या विचाराचा मी विचार काढून टाकला होता . कारण लक्ष्मीला पोटभर खायला मिळाल्यामुळे खाण्यावरचे सर्व निर्बंध तिने झुगारून टाकले होते . पोटाने हे सर्व पचवण्यास असमर्थता दाखवली होती . कित्येक दिवसांच्या उपाशी राहण्याने पोट आळलेले असल्यामुळे एकाएकी खाणे तिला मानवले नाही . तिला संडासला लागले होते ; त्यामुळे मी तणावात होतो . अम्बुलंस नाही मिळाली तर माझी मोठीच अडचण होणार होती . त्यातच सकाळी ' शरणाप्पा ' नावाचा आणखी एक पुरुष मनोरुग्ण बांधव भेटला होता . मला कन्नड येत नसल्यामुळे , कन्नड बोलणाऱ्या किशोरी वहिणीला फोन करून भाषांतर करून त्याला तिथे बसण्यास सांगितले होते . पण यावेळी बाळ केसरकर नावाचा माझा मित्र अम्बुलंस मिळवून देण्यसाठी धावून आला नसता तर माझी प्रचंड अडचण होणार होती . त्याबद्दल त्याचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत . जर अम्बुलंस मिळाली नसती तर या दोघांना हात धरून घेऊन जाणे माझ्याच्यानं शक्य नव्हते . भगवा रक्षकची अम्बुलंस दुरुस्त नव्हती . गढहिंग्लज मधील जय गणेश ग्रुपने अम्बुलंस देण्यात पुढाकार घेतला . यासाठी सुधीरभाऊ , राहुल शिंदे या बाळच्या मित्रांचे सहकार्य लाभले . सुनील नावाच्या अतिशय सफाईदार वाहन चालवणाऱ्या मित्राची यानिमित्ताने ओळख झाली . पूर्णपणे निर्व्यसनी असल्यामुळे मी रुग्णवाहिकेत बिनधास्त बसलो होतो . तरी मला गाडीत इतका वेळ गप्प बसलेल्या दोघांबद्दल खूपच काळजी वाटत होती . एकाएकी कुणी आक्रमक झाले तर काय करायचे हा प्रश्न माझ्यासमोर पडला होता . पण मी सतत हसत मागे बघत असायचो त्यावेळी दोघेही मला सकारात्मक प्रतिसाद द्यायचे .
खुपदा फिरून फिरून दोघेही काहीतरी गुणगुणत असल्याचे मी ऐकले . मी लक्ष देऊन ऐकत होतो पण दोघांच्याही भाषा मला काळात नव्हत्या . परंतु मुसाफिर प्रवासाला जाताना हर्षभराने जी गाणी गातो त्याच्यासारखी हि गाणी होती . मला मनातच असे वाटत होते कि , आपले हॉस्पिटल असायला हवे होते . असले अनेक अनुभव आणि हि गाणी सतत ऐकत येतील . कारण असे मनोरोगी घराबाहेर पडतात ते आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने आणि उपचार न होऊ शकल्याने ! आपण पाठवलेले २ मनोरोगी शामराव आणि सिकंदर घर नसल्यामुळे पुन्हा रस्त्यावर आलेले आहेत . ते आता मानसिक रोगी नाहीत ; परंतु घर नसल्याने त्यांना रस्त्यावरच राहावे लागत आहे . असो !
शरणाप्पा आपल्याजवळील कागद वाचत होता . लक्ष्मीबाईचे कपडे मी व्यवस्थित करत असताना शरणाप्पा कन्नडमध्ये मला म्हणाला कि , ' ती एक स्त्री असल्यामुळे तिच्या अंगाला हात लावू नकोस , लोक मारतील ! ' हे भाषांतर सुनीलभाऊंमुळे शक्य झाले होते . मला शरणाप्पाचा आदर वाटायला लागला . बसवेश्वर असेच असतील असेही एकदा वाटले !
वाटेत ' हरिहर ' नावाचा आणखी एक ' अवलिया ' ( आतापासून आपण मनोरोगी ऐवजी ' अवलिया ' शब्द वापरू ! खूप दिवसांपासूनची माझी हि इच्छा आहे ! ) भेटला . त्याला गाडीत बसवून घेण्यासाठी काही बाही हिंदीत सांगितले . खूप प्रयत्न केल्यावर तो राजी झाला . तो गाडीत बसला . त्याने आपले गाव उडीसा राज्यात असल्याचे सांगितले . पायाला प्रचंड चिंध्या बांधलेल्या होत्या . तो गाडीत बसून शरणाप्पाशी काही बाही बोलत होता . उडिया भाषेतला तो संवाद शरणाप्पाला काहीच काळात नव्हता ; तरीहि शरणाप्पा चुपचाप ऐकत होता आणि मान डोलवत होता . मला त्यांच्या ह्या संवादाचे अप्रूप वाटत होते . ( ह्या हरिहर दुबेंकडे २ चाकू होते . श्रद्धा मध्ये गेल्यावर तिथल्या स्वयसेविकेला त्याने ते दिले . पण ते चाकू बघून मी खूपच हादरलो . गाडीतून तो शांतपणे आल्याबद्दल त्याचे मनोमन आभार माणले . )
रात्री साधारण ११ . ०० च्या दरम्यान आम्ही ' श्रद्धा ' मध्ये पोहोचलो रितू वर्मा आणि फरझाना अन्सारी ह्या दोन मनोसामाजिक सेविका आमची वाटच बघत होत्या . त्यांनी त्त्यांना दाखल करून घेण्याची सर्व प्रक्रिया केली आणि आम्हांला फ्रेश होऊन जेवण घेण्यास सांगितले .
ह्या सेन्टरमध्ये पूर्वीही ३-४ वेळा मी येवून गेलोय पण मनोरुग्णांना सोडून जावे लागण्यामुळे , खूप भावनिक झाल्यामुळे किंवा इतर कारणांमुळे मी जेवण घेत नव्हतो ; पण यावेळी मी जेवलो . माझ्यात झालेला हा बदल मी रीतुजी आणि फरजाना यांना सांगितला . त्यांच्याशी अल्बर्ट एलीसच्या अनेक गोष्टी शेअर करत असताना सुनीलभाऊ म्हणाले, ' निघूया का ? ' राहिलेला हा संवाद पुढच्या वेळी करण्याचा शब्द देऊन मी गाडीत बसलो . कधी कधी इथेच श्रद्धामध्येच रहावेसे वाटते मला !
आर्थिक मदत करणाऱ्यांची नावे :-
राजन देसाई - १००० , के . एस . डेळेकर - १००० , आर . एल . तराळ - १००० , वीरा तानाजी शिंदे - ५०० , महादेव पोवार - ५०० , एस . आर . कातळे - ५०० , महेश घोळसे - ५०० , संजय गावडे - २०० , राजवीर जाधव - २०० , बाळ केसरकर - १५० , उत्तम कारेकर - १०० ------ एकूण :- ५६५०
खर्च :-
लक्ष्मिला चप्पल आणि पिशवी :- ८० , संगीता गोसावी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी लक्ष्मिला ठेवून घेतले तेव्हा सर्व कुटुंबियांना खाण्यासाठी आईस्क्रीम :- १२० , भजी आणि फ्रुटी लक्ष्मिसाठी :- १७ , रुग्णवाहिका खर्च :- ४२१० , पाणी आणि रसाच्या बाटल्या :- २६० , बिस्किटे व कलिंगड ( दोघांसाठी आणि आम्हालाही ) २२० -----------एकूण :- ४९०७
शिल्लक :- ७४३ /-